अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्ह स्टोरी, अशोक सराफ यांनी सांगितला प्रेमात पडल्याचा किस्सा..
मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ! मराठी चित्रपटातील एक काळ अनेक चित्रपटात जोडीने काम करत हे दोघेही रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरले आहेत! १९९० साली गोव्यामधील मंगेशीच्या मंदिरात या जोडीचा विवाह संपन्न झालेला. अशोक सराफ हे निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांचे खूप चांगले मित्र होते त्यामुळे त्यांची निवेदिता सोबत देखील खूपच जुनी ओळख होती. वेगवेगळ्या सिनेमात एकत्रित काम करत असताना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले ही गोष्ट बहुतांशी लोकांना माहित आहे. याच पार्श्वभूमीवर अशोक सराफ यांनी निवेदिताच्या प्रेमात पडल्याचा एक गोड किस्सा मीडियाला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सांगितला आहे! अनेकदा अशोक सराफ आपल्या पर्सनल आयुष्य तसेच वैवाहिक आयुष्याबद्दल खूप कमी वेळा बोलताना दिसले आहेत. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यांनी निवेदिताच्या प्रेमात ते कसे पडले? याबाबतचा एक किस्सा सांगितलेला आहे.
मामला पोरींचा या १९८८ दरम्यान आलेल्या चित्रपटात या जोडीने एकत्रित काम केलं होतं. त्यावेळी घडलेल्या प्रसंगा बाबत अशोक सराफ म्हणतात की,
“मामला पोरींचा या चित्रपटात एकत्रित काम करत असताना निवेदिताचे पॅकअप झालं, त्यानंतर ती माझ्या जवळ आली आणि मला बाय म्हणाली. त्यावेळी मला वाईट वाटलं. पण मी ते चेहऱ्यावर दिसू दिल नाही. ती जात असताना माझ्या डोक्यात आलं की समोर असलेल्या दाराजवळ गेल्यावर ती आपल्याकडे वळून बघणार आणि तसंच झालं आणि तेव्हाच मला खात्री पटली की आमच्यामध्ये नक्की काहीतरी आहे!”
यानंतर आलेल्या नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमात या जोडीने पुन्हा एकदा एकत्रित काम केलं आणि याचवेळी त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर अखेर प्रेमात झालं! खरंतर निवेदिताच्या आईचा या लग्नाला विरोध होता कारण अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयात १८ वर्षाचा अंतर आहे म्हणून त्यांना ही गोष्ट मान्य नव्हती. मात्र यांच्या लग्नासाठी बहिणीने घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांना अखेरीस लग्नाला परवानगी मिळाली. त्यानंतर गोव्यामधील मंगेशीच्या मंदिरात आई आणि बहिणीसह एकत्रित जाऊन या दोघांनी अगदी साधेपणाने विवाह सोहळा पार पाडला होता. मुलगा अनिकेतच्या जन्मानंतर निवेदिता सराफ यांनी कलाक्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला. मात्र हंसगामिनी साड्यांचा बिझनेस सांभाळत त्यांनी पुन्हा एकदा सिनेमा आणि मालिकांमधून यशस्वी पदार्पण केले. ‘अगबाई सासुबाई’ या मालिके नंतर त्या छोट्या पडद्यावर चांगल्याच रमलेल्या सर्वांना पाहायला मिळाल्या. सध्या त्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत रत्नमाला मोहिते यांचे पात्र निभावताना दिसत आहेत.