छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात पक्के स्थान मिळवले आहे. सध्या ही मालिका चांगल्याच उत्कंठा वर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. आता मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची वाढणारी जवळीक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते आहे. पण आता सध्या या मालिकेचा ट्रॅक बदललेला पाहायला मिळतोय. ऐन दिवाळीत अरुंधती मालिकेतून गायब झाली आहे. ती कुठे आहे अशी चर्चा नेट कऱ्यांमध्ये रंगत आहे. आणि आता अरुंधती मालिकेत का दिसत नाहीये याचं खरं कारण समोर आलं आहे. इंस्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट शेयर करत तिने स्वतःच याविषयी मोठा खुलासा केला आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा नवरा दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं हॉटेल बुकींग केलं होतं. गणपतीपुळेतील ग्रीनलीफ रिसॉर्टमध्येमध्ये त्यांनी २ दिवसांसाठी १७ हजार रुपये देऊन बुकिंग केलं होतं. परंतू त्यांनी दिलेले पैसे हे भलत्याच अकाऊंटला ट्रान्सफर झाले. हॉटेल व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक केल्याचं प्रमोद प्रभुलकर यांनी म्हटलं होतं. मात्र हॉटेलची वेब साइट हॅक झाल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं आहे. आता याविषयी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने पोस्ट लिहीत ती मालिकेत दिसत नसल्याचा आणि या प्रकरणाचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट केले आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे कि, ”गेले ५ महिने मी जाणीपूर्वक सोशल मीडिया वर कार्यरत नाही. पण काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. काल पासून ‘ मधुराणी प्रभुलकर ह्यांना हजारोंचा गंडा ‘ ‘ मधुराणी प्रभुलकर ह्यांची फसवणुक ‘ , अशा बातम्या काही वृत्तपत्रांच्या पोर्टल्स वर येत आहेत. पण वास्तवात त्यात नमूद केलेल्या गणपतीपुळे येथील हॉटेल मध्ये मी स्वतः गेलेलेच नाही.”
View this post on Instagram
मालिकेत न दिसण्याचं कारण सांगत ती म्हणाली आहे कि, ”माझी एक छोटी सर्जरी झाली असल्याकारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे. आणि लवकरच की मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन.’
तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिला तिच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘काळजी घ्या लवकर बर्या व्हा.’ ‘मधुराणी ताई तू फक्त आता स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घे, बाकी क्षुल्लक गोष्टींचा विचार सोडून दे आणि आमची अरुंधती लवकरच मालिकेत येऊ दे’ अशा कमेंट करत चाहत्यांनी तिला धीर दिला आहे. मधुराणी यांनी पोस्ट करत मालिकेत नसल्याचं कारण सांगितल्याने अफवांना चांगलाच लगाम बसला आहे.