‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणादा आणि पाठक बाई यांची जोडी झळकणार आता ‘या’ चित्रपटात, सोशल मीडियावर पोस्टर होत आहे व्हायरल..
एकेकाळी झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते! यातील राणादा आणि पाठक बाईंची जोडी अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचलेली. ही लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी! या दोघांच्याही जोडीला तुझ्यात जीव रंगला या मालिकेत एकत्र काम केल्यानंतर प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
त्यानंतर ही मालिका बंद झाल्यावरही या दोघांचे चाहते त्या दोघांना पुन्हा एकत्र काम करण्यासाठी कित्येक वेळा आग्रह धरताना दिसले. तर आता याच चाहत्यांसाठी आम्ही खुशखबर घेऊन आलो आहोत, ती म्हणजे ही जोडी आता आपल्याला पुन्हा एकदा एका सिनेमाच्या माध्यमातून एकत्र आलेली दिसणार आहे!
हार्दिक आणि अक्षयाच्या चाहत्यांसाठी खरोखरच हा एक गोड धक्का आहे! ‘फाईल नंबर ४९८ अ’ या नावाच्या सिनेमात हे दोघेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.
View this post on Instagram
आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मूव्हीज प्रस्तुत, मल्हार गणेश दिग्दर्शित ‘फाईल नंबर ४९८ अ’ या सिनेमाची कथा श्रीधर तावरे यांनी लिहिलेली आहे. तर आशिष निनगुरकर आणि श्रीधर तावरे या दोघांनी मिळून याची पटकथा देखील लिहिली आहे. या सिनेमातील संवाद आणि गीत लेखन आशिष निनगुरकर यांच आहे तर स्वप्निल-प्रफुल्ल या जोडीने या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. भारतीय कायद्यामधील ४९८ या कलमा अंतर्गत एक तरुण कसा काय अडकतो? याची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. अलीकडेच सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर देखील लाँच करण्यात आलं होतं. यावेळी पोस्टर पाहून दोघांच्याही चाहत्यांना सुखद धक्का बसला आणि या पोस्टवर सर्व चाहत्यांनी या सिनेमाची शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे!
अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी या लोकप्रिय जोडीला महाराष्ट्रानं आतापर्यंत भरभरून प्रेम दिलं आहे आणि आता ही मालिका संपल्यावर त्यांचा नवा प्रवास देखील सुरू झाला आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा कधी एकत्र काम करताना दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागलेलं होतं. त्यामुळेच हार्दिक आणि अक्षया यांना पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा ‘फाईल नंबर ४९८ अ’ या सिनेमामुळे पूर्ण होताना दिसणार आहे. यात हे दोघेही प्रमुख भूमिकेमध्ये दिसतील. नावापासूनच उत्सुकता निर्माण झालेल्या या सिनेमातून अक्षया आणि हार्दिक पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र येत असल्याने या सिनेमाविषयीची प्रेक्षकांची उत्कंठा जास्तच वाढली आहे एवढं नक्की!