स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्या लोकप्रिय ठरत असलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं.. या मालिकेतील ट्विस्टमुळे या मालिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेतील गौरी आणि जयदीप यांची क्यूट जोडी आणि त्यांची गोड अशी केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. अखेर या मालिकेत गौरी आणि जयदीप यांच्या नात्यात आलेला दुरावा अखेर मिटला आहे. दरम्यान मालिकेशी निगडित एक बातमी समोर आली आहे. या मालिकेतील एक लोकप्रिय पात्र आता मालिकेला कायमचा राम राम ठोकणार आहे. हा कलाकार दुसरा तिसरा कुणी नसून मालिकेत जयदिपच्या लाहापणीची मैत्रिणीची मानसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासार..
अभिनेत्री अश्विनी कासारने सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मानसीची भूमिका साकारली होती. या मालिकेत आता ती पाहायला मिळणार नाही. या मागचे कारण म्हणजे या मालिकेतील तिचा ट्रॅक संपला आहे. नुकताच तिने गौरी आणि जयदीपसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि लिहिले की, आणि अखेर ते आनंदी आयुष्य जगत आहेत. (काही काळापुरतं). मला सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील प्रत्येकाचे आभार मानायचे आहेत. तिने या मालिकेतील निर्माते, कलाकार आणि इतर मंडळींचे आभार मानले आहेत. तसेच तिने हे मिस करत असल्याचेही सांगितले.
अश्विनी कासारने कलर्स मराठीवरील कमला या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. अश्विनीने साकारलेली कमला प्रसिद्धी मिळवताना दिसली होती. कट्टी बट्टी, मोलकरीण बाई, सावित्री ज्योती या मालिकेत ती महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली होती.कमला या मालिकेमुळे अश्विनीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तर सावित्री ज्योती मालिकेत तिने साकारलेली सावित्रीबाईंची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. मात्र टीआरपी न मिळाल्याने ही मालिका अर्ध्यावरच बंद पडली होती. मराठी ऍक्टर्स राउंड टेबल या नावाने सिरीज बनवण्यात आली आहे त्यात अश्विनी कासार महत्वाच्या भूमिकेत झळकली होती.
दरम्यान, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत अखेर जयदीपला त्याची खरी गौरी मिळाली आहे. खऱ्या गौरीचं मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. भलेही गौरीला जीवे मारण्याचे आरोप मानसी आणि अनिल त्यांच्यावर घेत असले. तरीदेखील माई, जयदीप आणि गौरी यांना माहित आहे की, या सगळ्याचा सूत्रधार शालिनी वहिनी आहे. त्यामुळे माई गौरीला तू गीताच्या स्टाईलमध्ये तिला समज दे असे सांगतात. गौरीदेखील शालिनीला सक्त ताकीद देते. त्यामुळे आता शालिनी पुन्हा काही कारस्थान करणार का?, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.