अवघा दोन महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेणार झी मराठी वाहिनीवरील ही मालिका.. त्या जागी येणार दमदार मालिका, जाणून घ्या कोणत्या आहेत या मालिका..?
झी मराठी वाहिनीने आजवर अनेक विविध विषयांवर आधारित मालिका आणल्या आहेत. पण गेल्या काही काळात वाहिनीचा टीआरपी म्हणावा तितका चांगला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्याकडे वळवण्यासाठी या वाहिनीवरील जवळपास सर्वच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. नवीन रिऍलिटी शो आणि नव्या मालिका या वाहिनीवर दाखल होत आहेत. मन झालं बाजींद मालिकेनंतर झी वाहिनीने सत्यवान सावित्री ही नवी पौराणिक मालिका आणली होती. १२ जून रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला.
मात्र या मालिकेला प्रेक्षकांनी पुरेसा प्रतिसाद न दिल्याने अवघ्या दोन महिन्यातच या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. येत्या २२ ऑगस्टपासून झी मराठीवर संध्याकाळी ७ वाजता ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही नवीन मालिका सुरू होत आहे. श्वेता शिंदे निर्मित अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला असून प्रेक्षकांनी या नव्या दमाच्या मालिकेचे स्वागत केलेले पाहायला मिळत आहे. या मालिकेची नायिका कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ही नवखी अभिनेत्री आहे ‘शिवानी नाईक’.
शिवानी नाईक हिची ही पहिलीच मालिका आहे त्याअगोदर तिने नाटकांमधून आणि चित्रपटांमधून काम केले आहे. शिवानी सफरचंद या चित्रपटात शिवणू मुख्य भूमिकेत झळकत आहे. नुकताच येऊन गेलेल्या वाय या चित्रपटात ही ती दिसली होती. विविध राज्यनाट्य स्पर्धा , एकांकिकेतून शिवानीने उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकं पटकावली आहेत. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून तिच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळणार आहे त्यामुळे ती या भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहे.
याबाबत ती म्हणाली, मी खूप भाग्यवान आहे की मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळतेय. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करणा-या मुलीची भूमिका मला करायला मिळणार आहे. मी खूप खुश आहे कारण मी एका महत्त्वकांक्षा असणाऱ्या मुलीची भूमिका करणार आहे आणि ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.
दरम्यान, मालिकेत अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडेगावात रहाते. तिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठलं मार्गदर्शन नाही. पण तिचं ध्येय खूप मोठं आहे. तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करून ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे. आता एका मुलीची ही संघर्ष कथा प्रेक्षकांच्या मनात कितपत स्थान मिळवते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.