‘तू चाल पुढे’ या नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का? धनश्री काडगावकर साकारणार पुन्हा एकदा दमदार व्यक्तिरेखा..

काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची क्रेझ सगळ्या महाराष्ट्रभर पसरलेली दिसत होती. त्यातील राणादा, अंजली बाई व मालिकेतील इतर सह कलाकार या सर्वांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात यश संपादन केले होते! याच मालिकेतील वहिनीसाहेब ही व्यक्तिरेखा प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीत, याचे कारण म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकरणे ही भूमिका अत्यंत लक्षवेधकरीत्या साकारली होती. त्यामुळे या मालिकेत दिसणारा वहिनी साहेबांचा धाक आणि त्यांचा दरारा आजही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतो.

 

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिके नंतर धनश्रीचा छोट्या पडद्यावरील वावर कमी झाला होता याचे कारण म्हणजे तिला तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या मुलाला कबीरला द्यायचा होता, यासाठीच तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. मात्र आता एक ते दीड वर्षाच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर धनश्री पुन्हा एकदा मराठीतील छोट्या पडद्यावर कम बॅक करत आहे आणि याची विशेष बाब म्हणजे या नवीन मालिकेतही तिचा तोच पूर्वीचा दरारा रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

झी मराठीवर लवकरच ‘तू चाल पुढं’ या नावाची नवीन मालिका रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे आणि याच मालिकेच्या माध्यमातून धनश्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या मालिकेचा प्रोमो ऑन एयर झाल्यापासून सर्व प्रेक्षकांमध्ये या मालिकेच्या कथानका बद्दल आणि त्यातील पात्रांबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच एकंदरीत या मालिकेविषयी आणि यातील निभावणाऱ्या भूमिकेविषयी धनश्रीने तिचा मत देखील व्यक्त केलं आहे.

“या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शिल्पी आहे, जी तिच्या माहेरी येऊन राहतेय आणि तिला सतत असं वाटतं कि तिच्या आयुष्यात जे काही चुकीचं घडलं त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त अश्विनी आहे. त्यामुळे शिल्पी अश्विनीला सतत घालून पडून बोलते, प्रत्येक गोष्टींमध्ये तिच्या चुका काढते जस प्रोमोमध्ये देखील प्रेक्षकांनी पाहिलं कि शिल्पी कशी तिच्या वहिनी अश्विनीला टोमणे मारते. अशा प्रकारची एक नकारात्मक भूमिका पुन्हा एकदा मी साकारतेय त्यामुळे जशी वहिनीसाहेब सगळ्यांच्या लक्षात राहिली तशीच शिल्पी देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी मी आशा करते,” असं धनश्री यावेळी म्हणाली.

दरम्यान ही मालिका येत्या १५ ऑगस्ट पासून सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment

Close Visit uttamsheti