दुःखद बातमी..! मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराने निधन…!
मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत अनेक आतरंगी भूमिक निभावल्या आहेत असे ज्येष्ठ कलाकार प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्या अशा अचानक सोडून जाण्याने कलाविश्वात दुःखी वातावरण पसरले आहे. आजवर त्यांनी अनेक चित्रपट व मालिकेत अभिनय केला आहे, कधी खलनायक म्हणून तर कधी विनोदी पात्र घेऊन ते रसिकांच्या भेटीस आले आहेत. प्रत्येक भूमिकेत त्यांना पाहताना काहीसं नवीन वाटत,त्यामुळे एक कलाकार या नात्याने त्यांनी प्रत्येक वेळी नवी लोकप्रियता मिळवली आहे आणि म्हणून तर आज त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
प्रदीप हे वयाने ६४ वर्षाचे होते, मुंबईतील राहत्या घरीच त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. मराठी कलाविश्वात कार्यरत असणारे अनेक जुने व नवखे कलाकार भावुक झाले आहेत. प्रदीप यांचे रंगभूमीवरील काम अतिशय कौतुकास्पद होते. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका पार पाडल्या आहेत, “मोरूची मावशी” हे त्यांचे रंगभूमीवर सर्वात जास्त गाजलेले नाटक आहे. नाटकाचे कथानक आणि यातील लक्षवेधी पात्रे आजदेखील आवडीने पाहिली जातात. याच नाटकामुळे प्रदीप यांना अभिनय क्षेत्रात पुढे ओळख मिळत गेली आणि एक अभिनेता म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला.
मराठी चित्रपट सृष्टीत खूपसे विनोदवीर होऊन गेले आहेत आणि अजून काही कार्यरत देखील आहेत त्यांच्या यादीत प्रदीप यांचे नाव आवर्जून घेतले जाते. आजवर रसिकांना त्यांनी खळखळून हसवले आहे, चेहऱ्यावर असणारे स्मित आणि हालचालीत देखील लपलेला अभिनय त्यांची प्रत्येक भूमिका खास बनवतो. गिरगावात राहणारे प्रदीप शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धेत सहभागी झाले होते. हळूहळू ते व्यावसायिक नाटकांकडे वळले. “१८८५” साली आलेले सुयोग निर्मित “मोरूची मावशी” भरपूर गाजलेले नाटक आहे.
या नाटकात प्रदीप यांनी अभिनेता प्रशांत दामले यांच्या सोबत काम केले होते. या नाटकाचे जवळपास दोन हजारहून अधिक प्रयोग करण्यात आले होते. या नाटकाचे प्रदीप यांना खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली आहे. सोबतच त्यांनी “नवरा माझा नवसाचा”, “चष्मे बहाद्दर”, “१२३४”,”भुताळलेला” ,”नवरा माझा भवरा” ,”डोम” ,”मी शिवाजीराजे भोसले बोलतोय”, “जमलं हो जमलं”, “एक शोध” यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील त्यांची प्रत्येक भूमिका अप्रतिम ठरली आहे.
असे हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते सोडून गेल्याने मराठी कलाकारांसोबत रसिकांना देखील खूप वाईट वाटत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी भावुक होऊन प्रदीप यांना श्रद्धांजली वाहिली आहे. खूपसे कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे हिने सुद्धा ट्विट करता श्रद्धांजली वाहिली आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट करत प्रदीप यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत प्रदीप यांनी कलासृष्टीला अनेक भूमिकांना आजवर नटवले आहे, त्यांच्या या भूमिकेतून त्यांच्या आठवणी नेहमीच जपल्या जातील. आमच्या कडूनही प्रदीप यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!