झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेने अल्पावधीत चाहत्यांच्या मनावर आपली मोहोर उमटवत त्यांच्या मनात अगदी पक्के स्थान मिळवले. संध्याकाळची ८.३० ची वेळ आणि टिव्हीवर माझी तुझी रेशीम गाठ हे अगदी रोजचं ठरलेलं वेळापत्रक .. पण अचानक ही मालिका चाहत्यांना अलविदा म्हणतेय म्हंटल्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर जणू बंड पुकारले. या मालिकेच्या निर्मात्यांवर चाहत्यांची नाराजी जास्तच वाढत चाललेले आढळलं. याला कारण चाहत्यांचे प्रेमच आहे नाही का? आणि याच प्रेमापुढे मालिकेच्या निर्मात्यांना झुकावे लागले आहे. माझी तुझी रेशीम गाठ मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता त्यांची लाडकी आणि आवडती मालिका बंद होणार नाही तर दुसऱ्या वेळेत प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, सोशल मीडिया सोबत टिव्हीवर प्रदर्शित झालेल्या ‘दार उघड बये’ या नव्या मालिकेच्या प्रोमोने चाहत्यांना पेचात पाडले होते. आणि त्याचवेळी चर्चा होऊ लागली ती माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. या बातमीने मालिकेचे चाहते चांगलेच दुखावले गेले. त्यामुळे मालिका बंद होणार हे काही प्रेक्षकांना आवडलं नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यातले शूटिंग केल्याच्या पोस्ट मालिकेतील कलाकारांनी शेयर केल्या. या पोस्टनंतर अनेक प्रेक्षकांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले. ही मालिका सुरू झाल्यापासून त्यातील कलाकार मंडळी कायम चर्चेत होती. अचानक मालिका बंद होण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेचे चाहते नाराज झाले आणि सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
View this post on Instagram
सतत सोशल मीडियावर चाहते आपली नाराजी दर्शवत असल्यामुळे वाहिनी आणि निर्मात्यांनी विचार करून आता मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची आवडती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. आता ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता पाहता येणार आहे.
पण सोशल मीडियावर मालिकेतील प्रमुख कलाकारांनी मालिका संपणार म्हणून भावूक होत पोस्ट शेअर केल्या होत्या. अगदी शेवटच्या भागाचं शूटिंग झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. सोबतच व्हिडिओही शेअर केले गेले. पण आता निर्माते आणि वाहिनीनं निर्णय बदलल्यानं सूत्रांच्या माहितीनुसार उद्यापासून शूटिंग सुरू होत आहे. पुन्हा एकदा यश आणि नेहाचं प्रेम, समीरची मैत्री, परीची धमाल आणि सिम्मीचे कारनामे त्याच जोमाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.