छोटया पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या चिमुकल्या परीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.ती नेहमीच विविध व्हिडीओच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत येत असते. लहान वयातच सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी चिमुरडी मायरा वायकुळ आता मोबाईल पोल्युशनवर मेसेज देण्यासाठी सज्ज झाली आहे. आता ती एका शॉर्ट फिल्ममध्ये देखील झळकते आहे. मोबाईल पोल्युशनवर एक अतिशय समर्पक असणारी अशी काळजाचा ठाव घेणारी शॉर्टफिल्म गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या शॉर्टफिल्मचं प्रमुख आकर्षण आहे, तीची कन्सेप्ट आणि बालकलाकार मायरा वायकुळ. मायराची ही शॉर्टफिल्म अनेकांपर्यंत पोहोचावी म्हणून तिची निर्मिती मराठी, हिंदी आणि कन्नड अशा तीन भाषांमध्ये करण्यात आली आहे.
शॉर्टफिल्ममध्ये छोट्या अनूच्या म्हणजेच आपल्या मायरा वायकुळच्या पाचव्या वाढदिवसाची जंगी पार्टी असते. पण पार्टीत हजर असलेले नातेवाईक मोबाईलमध्ये व्यस्त असतात. पण वाढदिवसाच्या दिवशी हजर असलेले नातेवाईक मोबाईलमध्ये व्यस्त असतात. एकमेकांच्या समोर असून सुद्धा मोबाइलच्या माध्यमातून कनेक्ट होतात.
जेव्हा केक कापण्याची वेळ येते, तेव्हा तर सगळे मोबाईलला समोर धरून तो इव्हेंट शूट करतात. मात्र अनूला हे काही नकोय.. तिला मोबाईलच्या माध्यमातून नात्यांशी जोडायचं नाहीय; तर माणसांच्या सहवासातून नात्यांच्या घट्ट बंधनात गुंफलं जायचंय. तिला मोठ्ठा केक नकोय, मोठाले गिफ्ट नकोयत, तर तिला हवाय ‘वेळ’. या वेळेतूनच तिला हरवत चाललेली नाती जोडायची आहेत. त्या नात्यांमधला जीवंतपणा निर्माण करायचा आहे. तसं ती आग्रहाने सांगत Disconnect to Reconnect…हा महत्त्वाचा मेसेज देते.
शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन वैभव पंडित यांनी केलं आहे. शॉर्टफिल्मविषयी वैभव सांगतात, ” तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय. वेळ वाचत आहे. हे खरंय, पण अशा काही चांगल्या परिणामांचे दुष्परिणामही आहेत. सगळ्यात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे नात्यांमध्ये कृत्रीमता वाढू लागली आहे. माणसं एकमेकांना वेळ देण्यापेक्षा तंत्रज्ञानाला सर्वात जास्त वेळ देत आहेत. तंत्रज्ञानाचे फायदे मानवी नात्यांवर कसा परिणाम करतात हेच तर आम्ही शॉर्टफिल्ममधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आम्ही मोबाईलचं उदाहरण शॉर्टफिल्ममध्ये दिलं आहे.
मोबाईलमुळे जग जवळ आलं असलं तरी, नात्यांमधला जिव्हाळा कुठेतरी हरवत चालला आहे. त्यामुळे ‘सतर्क व्हा’ असा इशारा करणारी ही फिल्म अगदी रोजच्या आयुष्यात घडणारा एक प्रसंग बोलक्या स्वरुपात घेऊन आली आहे.