तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे हीचा अपघाती मृत्यू.. सिने इंडस्ट्रीने हळहळ व्यक्त केली..

0

झीमराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील बऱ्याच कलाकारांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना आपलेसे केले आहे. रानादा आणि अंजली यांच्याव्यतिरक्त गोदाक्का, बरकत, वाहिनीसाहेब, अशा अनेक पात्रांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली होती. पण तुम्हाला मालिकेतील अंजलीची जिवाभावाची मैत्रीण लक्षात आहे का? मालिकेत अंजलीच्या मैत्रिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील डंपरने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला आहे. कल्याणी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या अकस्मात मृत्यूनंतर चाहतेच काय सिनेइंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनुसार, कल्याणी कुरळे हिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एक हॉटेल सुरु केले होते. प्रेमाची भाकरी असे या हॉटेलचे नाव होते. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून कल्याणी आपल्या नातेवाईकांसोबत बाहेर पडली. नातेवाईक हे रिक्षामधून तर कल्याणी आपल्या दुचाकीवरून निघाली होती. हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिला धडक दिली. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला.

आणि या घटनेत सर्वात जिव्हारी लागणारी गोष्ट म्हणजे कल्याणीने फक्त एका आठवडाभरापूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. “काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली…मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या.., असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

ही पोस्ट सर्वत्र रीपोस्ट करत चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत. कल्याणीने आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर दमदार काम करत प्रसिद्धीझोतात येण्याची संधी मिळवली होती. तिने झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. ज्यामुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. त्याबरोबर तिने सन मराठी या वाहिनीवरील दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.

कल्याणी ही मूळची कोल्हापूरची आहे. ती महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होती. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असायची. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहायची.कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप