सध्या झी मराठी वाहिनीवर अनेक नव्या मालिका येऊ घातल्या आहेत. आणि अल्पावधीतच या मालिका चाहत्यांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरत आहेत. दरम्यान, लोकमान्य या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ते म्हणजे या मालिकेचे मुख्य पात्र साकारणाऱ्या कलाकारांमुळे. या मालिकेत स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते यांची प्रमुख भूमिका साकारत आहेत. या दोघांचा उत्कृष्ट अभिनय आणि केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.
स्पृहाने झी मराठी वाहिनीवरीलच उंच माझा झोका या मालिकेतील साकारलेली रमाबाई खूप गाजली होती. टिळकांच्या पत्नीची भूमिका स्पृहाने अगदी उत्कृष्टपणे साकारली आहे. स्पृहाने आजवर अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका बजावत चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे.
पण तुम्हाला माहित आहे का ? स्पृहाची बहीण देखील एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. स्पृहाची बहिण क्षिप्रा जोशी ही देखील लोकप्रिय आहे. स्पृहाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती तर क्षिप्राला खेळाची विशेष आवड होती. हीच आवड जोपासत क्षिप्राने पुढे मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट मधून डिप्लोमा केलेला आहे. २०१० साली वर्ल्ड जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप मध्ये जिम्नॅस्टिक प्लेअर म्हणून क्षिप्राने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
प्रीमिअर रिदमीक जिम्नॅस्टिक अकॅडमी येथे ती सिनिअर कोच म्हणून कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघ अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर जजची भूमिका तिने निभावली होती. २१ मार्च २०११ रोजी एका मिनिटामध्ये ‘१८० डिग्री बॅलन्स पोजीशन’ मधून स्वतःभोवती तब्बल १८ वेळा फेऱ्या मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिने बनवला होता. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने क्षिप्राचा ‘शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला होता. हा महाराष्ट्र शासनाचा मोठा पुरस्कार मानला जातो. यावेळी क्षिप्राचे सर्वच स्तरातून मोठे कौतुक करण्यात आले होते. यासोबतच उत्तम कामगिरी करून अनेक राज्यस्तरीय पुरस्कार तिने प्राप्त केली आहेत.
अनेक वर्षे मेहनत आणि जिद्दीने क्षिप्राने इंडियन रीदमीक जिम्नॅस्टिकच्या कॅप्टनपदाची धुरा सांभाळली आणि सध्या ती ती एक सिनिअर कोच म्हणून नावलौकिक संपादित करते आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट ऑलम्पिक गेम्स साठी तिला जज म्हणून बोलावण्यात आले होते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणाऱ्या क्षिप्रा जोशीच्या या यशस्वी कारकिर्दीचा सर्वांनाच अभिमान वाटावा असाच आहे. काही वर्षांपूर्वी तिने म्युजिक कंपोजर आणि साउंड डिझायनर असलेल्या कल्पेश मोरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आजही ती मुलींना जिम्नॅस्टिकचे उत्कृष्ट धडे देताना पाहायला मिळते मधल्या महामारीच्या काळात देखील त्यांनी ऑनलाईन येऊन मुलींना जिम्नॅस्टिकचे काही सराव पद्धती आणि टिप्स दिलेल्या पाहायला मिळाल्या होत्या.